Monday, October 21, 2013

हरणटोळ

कॉमन व्हाइन स्नेक अथवा हरणटोळ हा निमविषारी सर्प सर्वसाधारणपणे हिरवा अथवा पोपटी रंगामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. मात्र पूर्णत ः तपकिरी रंगाचे सापही आपल्याकडे क्वचित सापडतात. माथेरान हिल स्टेशनला तर एका रात्रीत १०-१५ सर्प हमखास दिसतील इतके कॉमन हे सर्प आहेत.
हरणटोळ जातीचा सर्प टाळू फोडतो अशी आपल्याकडे अंधश्रध्दा आहे. हरणटोळ हा साप अतिशय नाजूक असून तो भक्षाच्या शिकारीसाठी झाडावर उंच बसतो. पाली, लहान पक्षी, पक्षांची पिल्ले, पक्षांची अंडी तसचं बेडूक हे त्याचं आवडतं खाद्य. झाडावर उंच बसल्यानंतर जर त्याला धोका निर्माण झाला तर तो हल्ला करतो. झाडावरून हल्ला केल्याने त्याला माणसाचे डोके जवळ पडत असल्याने हरणटोळ टाळू फोडतो अशी अंधश्रध्दा आपल्याकडे आहे. मात्र, डोक्याची शस्त्रक्रीया करताना डॉक्टरांना देखील छिन्नी हातोडी सारख्या दणकट गोष्टी वापराव्या लागतात त्यामूळे हरणटोळ सारख्या नाजूक सर्पाने टाळू फोडणं हे कदापी शक्य नाही. या उलट त्याचे नाक मऊ असल्याने हल्ला केल्यानंतर त्याच्या नाकालाच इजा होण्याची शक्यता जास्त असते.

- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
दिवसा येऊरच्या जंगलात भेंडीनाल्यानजिक हे हरणटोळचे छायाचित्र घेण्यात आले आहे. कॅनन ५० डि कॅमेरा आणि टॅमरॉन ९० मीमीच्या लेन्सच्या सहाय्याने हे छायाचित्र टिपले असून जंगलात हिरव्या बॅग्राउंडवर या हरणटोचा रंग मिसळू न देता उलट तो उठून दिसावा यासाठी एका फ्लॅशच्या सहाय्याने हे छायाचित्र घेतले आहे. फ्लॅशला अनुसरून  कॅमेर्‍यात १ /८० सेकंद शटर स्पीड, अॅपेरचर १४ आणि आयएसओ २०० ला हे छायाचित्र घेतल्याने बॅग्राउंड ब्लॅक आउट करण्यात यश आले आहे. त्यामूळे बर्‍याचदा हे छायाचित्र रात्री घेतल्याचा संभ्रम होतो.

छायाचित्र ः धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट
छायाचित्रण ठिकाण ः येऊर, ठाणे

www.photoorb.in

(नोंद * सदरचा लेख हा दैनिक सकाळच्या जंगलबुक या सदराकरीता लिहला असून हा लेख 5 जानेवारी, 2012 रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आला होता)

Thursday, October 17, 2013

चतुराचे पंख

दिवसभर हवेत घिरट्या मारत, आपल्या भक्षाचा पाठलाग करत कोणत्याही दिशेला वेगाने उडणारे चतुर सायंकाळी मात्र एकाजागी विसावतं. संध्याकाळी अशाच एका चतुराच्या पखांचा घेतलेला हा क्लोजअप.
पंख हे चतुराच्या शरिरातील अतिमहत्वाचा भाग. चतुराच्या शरिराच्या एकूण वजनाच्या सुमारे ६० टक्के भाग हा निव्वळ उडण्यासाठी उपयोगात येणार्‍या पंखांनी बनला आहे. दोन पंखांच्या जोडीच्या सहाय्याने चतुर हे हवेत कोणत्याही दिशेने आपला प्रवास करू शकतात. मागच्या अथवा आडव्या दिशेनेही उडणे चतुरांना अवगत असते. सुमारे २५ ते ३० किमी ताशी वेगाने उडणारे चतुर हे हवेतल्या हवेत आपले भक्ष पकडण्यात माहीर असतात. डास, छोटे कीटक, माशा तसचं प्रासंगी फुलपाखरं अथवा पतंग हे चतुराचं आवडतं खाद्य. चतुराच्या या वेगवान पंखांचा उपयोग सुर्यप्रकाशातील उर्जा शोषून घेण्यासाठीही केला जातो.
- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
स्टुडीओमध्ये एक कमर्शिअल मॉडेल शूट झाल्यानंतर पॅकींग करता करता वाट चुकलेल्या एका चतुराने माझे लक्ष वेधले. लगेचच कॅननच्या ५० डी कॅमेर्‍याला टॅमरॉनची ९० मीमीची मायक्रो लेन्स लावून त्याचे छायाचित्र करण्याचा मी प्रयत्न करू लागलो. स्टुडीओ लाइटजवळ एका स्टँडवर तो निवांत बसल्याने मला त्याची मनसोक्त फोटोग्राफी करता आली. शटरस्पीड १ / २५०० सेकंद, अॅपेरचर २.८ आणि २०० आयएसओला हे छायाचित्र घेतले. मावळत्या सूर्याच्या रंगांचा फिल यावा या करीता कॅमेर्‍यातील व्हाईट बॅलन्स हे केल्व्हीन या मोडवर ५४०० या तापमानावर सेट करून छायाचित्र घेण्यात आले आहे.

छायाचित्र ः धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट
छायाचित्रण ठिकाण ः कळवा, ठाणे

www.photoorb.in

(नोंद * सदरचा लेख हा दैनिक सकाळच्या जंगलबुक या सदराकरीता लिहला असून हा लेख ४ जानेवारी, २०१३ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आला होता)

Tuesday, October 15, 2013

चतुरांचे डोळे

हवेतल्या हवेत आपले भक्ष पकडण्यात पटाईत असलेल्या चतुरांना सजीवसृष्टीतील तरबेज शिकारी म्हणून देखील ओळखले जाते. भक्षावर तीक्ष्ण नजर ठेवण्यासाठी चतुरला नैसर्गिक देणगी लाभली आहे ती संयुक्त डोळ्यांची.
चतुरांच्या डोळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. चतुराच्या तोंडाजवळच संयुक्त डोळ्ंयाची रचना केली गेली असून यात तीस हजार भिंगांची मांडणी केलेली असते. या तीस हजार भिंगांच्या माध्यमातून चतुर आपल्या भक्षावर नजर ठेऊन असतो.
चतुराला संयुक्त डोळ्यांच्या जोडीत जरी हजारो भिंग असले तरी त्याला या भिंगांनी रंगांचे ज्ञान होत नाही. रंगांचे ज्ञान व्हावे यासाठी संयुक्त डोळयांच्या जोडीखाली तीन वेगळ्या डोळ्यांची मांडणी केली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, चतुर हे आपल्या संयुक्त डोळ्यांच्या विशीष्ट रचनेमुळे सुमारे ३६० कोनात बघू शकतात.
(वरील छायाचित्रातील चतुराच्या डोळ्यातील एक ठिपका हा त्याचा एक डोळा आहे.)

- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
सदरचे छायाचित्र हे एक्स्ट्रीम मायक्रो या विभागातील आहे. मायक्रो फोटोग्राफीच्या पलिकडची ही फोटोग्राफी असल्याने यात कॅननच्या ५० डी या कॅमेर्‍याला टॅमरॉनच्या ९० मीमी मायक्रो लेन्स शिवाय ६८ मीमीची एक्स्टेन्शन ट्यूब देखील लावण्यात आली होती. या ट्यूबमूळे कॅमेर्‍यात १.७५ पटीचे ऑप्टीकल मॅग्नीफीकेशन मिळवण्यात यश आले. चतुराचे संयुक्त डोळे आणि त्यातील हजारो डोळ्यांची रचना सुस्पष्ट दिसावी यासाठी एका फ्लॅशच्या मदतीने शटर स्पीड १ / २००, अॅपेरचर ९ आणि आयएसओ १०० वर हे छायाचित्र वसई रोडवरील नागलाबंदर येथे घेण्यात यश आले.

छायाचित्र ः धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट
छायाचित्रण ठिकाण ः नागलाबंदर, ठाणे


(नोंद * सदरचा लेख हा दैनिक सकाळच्या जंगलबुक या सदराकरीता लिहला असून हा लेख ३ जानेवारी, २०१३ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आला होता)