Tuesday, October 15, 2013

चतुरांचे डोळे

हवेतल्या हवेत आपले भक्ष पकडण्यात पटाईत असलेल्या चतुरांना सजीवसृष्टीतील तरबेज शिकारी म्हणून देखील ओळखले जाते. भक्षावर तीक्ष्ण नजर ठेवण्यासाठी चतुरला नैसर्गिक देणगी लाभली आहे ती संयुक्त डोळ्यांची.
चतुरांच्या डोळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. चतुराच्या तोंडाजवळच संयुक्त डोळ्ंयाची रचना केली गेली असून यात तीस हजार भिंगांची मांडणी केलेली असते. या तीस हजार भिंगांच्या माध्यमातून चतुर आपल्या भक्षावर नजर ठेऊन असतो.
चतुराला संयुक्त डोळ्यांच्या जोडीत जरी हजारो भिंग असले तरी त्याला या भिंगांनी रंगांचे ज्ञान होत नाही. रंगांचे ज्ञान व्हावे यासाठी संयुक्त डोळयांच्या जोडीखाली तीन वेगळ्या डोळ्यांची मांडणी केली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, चतुर हे आपल्या संयुक्त डोळ्यांच्या विशीष्ट रचनेमुळे सुमारे ३६० कोनात बघू शकतात.
(वरील छायाचित्रातील चतुराच्या डोळ्यातील एक ठिपका हा त्याचा एक डोळा आहे.)

- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
सदरचे छायाचित्र हे एक्स्ट्रीम मायक्रो या विभागातील आहे. मायक्रो फोटोग्राफीच्या पलिकडची ही फोटोग्राफी असल्याने यात कॅननच्या ५० डी या कॅमेर्‍याला टॅमरॉनच्या ९० मीमी मायक्रो लेन्स शिवाय ६८ मीमीची एक्स्टेन्शन ट्यूब देखील लावण्यात आली होती. या ट्यूबमूळे कॅमेर्‍यात १.७५ पटीचे ऑप्टीकल मॅग्नीफीकेशन मिळवण्यात यश आले. चतुराचे संयुक्त डोळे आणि त्यातील हजारो डोळ्यांची रचना सुस्पष्ट दिसावी यासाठी एका फ्लॅशच्या मदतीने शटर स्पीड १ / २००, अॅपेरचर ९ आणि आयएसओ १०० वर हे छायाचित्र वसई रोडवरील नागलाबंदर येथे घेण्यात यश आले.

छायाचित्र ः धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट
छायाचित्रण ठिकाण ः नागलाबंदर, ठाणे


(नोंद * सदरचा लेख हा दैनिक सकाळच्या जंगलबुक या सदराकरीता लिहला असून हा लेख ३ जानेवारी, २०१३ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आला होता)

No comments:

Post a Comment