Monday, October 21, 2013

हरणटोळ

कॉमन व्हाइन स्नेक अथवा हरणटोळ हा निमविषारी सर्प सर्वसाधारणपणे हिरवा अथवा पोपटी रंगामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. मात्र पूर्णत ः तपकिरी रंगाचे सापही आपल्याकडे क्वचित सापडतात. माथेरान हिल स्टेशनला तर एका रात्रीत १०-१५ सर्प हमखास दिसतील इतके कॉमन हे सर्प आहेत.
हरणटोळ जातीचा सर्प टाळू फोडतो अशी आपल्याकडे अंधश्रध्दा आहे. हरणटोळ हा साप अतिशय नाजूक असून तो भक्षाच्या शिकारीसाठी झाडावर उंच बसतो. पाली, लहान पक्षी, पक्षांची पिल्ले, पक्षांची अंडी तसचं बेडूक हे त्याचं आवडतं खाद्य. झाडावर उंच बसल्यानंतर जर त्याला धोका निर्माण झाला तर तो हल्ला करतो. झाडावरून हल्ला केल्याने त्याला माणसाचे डोके जवळ पडत असल्याने हरणटोळ टाळू फोडतो अशी अंधश्रध्दा आपल्याकडे आहे. मात्र, डोक्याची शस्त्रक्रीया करताना डॉक्टरांना देखील छिन्नी हातोडी सारख्या दणकट गोष्टी वापराव्या लागतात त्यामूळे हरणटोळ सारख्या नाजूक सर्पाने टाळू फोडणं हे कदापी शक्य नाही. या उलट त्याचे नाक मऊ असल्याने हल्ला केल्यानंतर त्याच्या नाकालाच इजा होण्याची शक्यता जास्त असते.

- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
दिवसा येऊरच्या जंगलात भेंडीनाल्यानजिक हे हरणटोळचे छायाचित्र घेण्यात आले आहे. कॅनन ५० डि कॅमेरा आणि टॅमरॉन ९० मीमीच्या लेन्सच्या सहाय्याने हे छायाचित्र टिपले असून जंगलात हिरव्या बॅग्राउंडवर या हरणटोचा रंग मिसळू न देता उलट तो उठून दिसावा यासाठी एका फ्लॅशच्या सहाय्याने हे छायाचित्र घेतले आहे. फ्लॅशला अनुसरून  कॅमेर्‍यात १ /८० सेकंद शटर स्पीड, अॅपेरचर १४ आणि आयएसओ २०० ला हे छायाचित्र घेतल्याने बॅग्राउंड ब्लॅक आउट करण्यात यश आले आहे. त्यामूळे बर्‍याचदा हे छायाचित्र रात्री घेतल्याचा संभ्रम होतो.

छायाचित्र ः धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट
छायाचित्रण ठिकाण ः येऊर, ठाणे

www.photoorb.in

(नोंद * सदरचा लेख हा दैनिक सकाळच्या जंगलबुक या सदराकरीता लिहला असून हा लेख 5 जानेवारी, 2012 रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आला होता)

Thursday, October 17, 2013

चतुराचे पंख

दिवसभर हवेत घिरट्या मारत, आपल्या भक्षाचा पाठलाग करत कोणत्याही दिशेला वेगाने उडणारे चतुर सायंकाळी मात्र एकाजागी विसावतं. संध्याकाळी अशाच एका चतुराच्या पखांचा घेतलेला हा क्लोजअप.
पंख हे चतुराच्या शरिरातील अतिमहत्वाचा भाग. चतुराच्या शरिराच्या एकूण वजनाच्या सुमारे ६० टक्के भाग हा निव्वळ उडण्यासाठी उपयोगात येणार्‍या पंखांनी बनला आहे. दोन पंखांच्या जोडीच्या सहाय्याने चतुर हे हवेत कोणत्याही दिशेने आपला प्रवास करू शकतात. मागच्या अथवा आडव्या दिशेनेही उडणे चतुरांना अवगत असते. सुमारे २५ ते ३० किमी ताशी वेगाने उडणारे चतुर हे हवेतल्या हवेत आपले भक्ष पकडण्यात माहीर असतात. डास, छोटे कीटक, माशा तसचं प्रासंगी फुलपाखरं अथवा पतंग हे चतुराचं आवडतं खाद्य. चतुराच्या या वेगवान पंखांचा उपयोग सुर्यप्रकाशातील उर्जा शोषून घेण्यासाठीही केला जातो.
- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
स्टुडीओमध्ये एक कमर्शिअल मॉडेल शूट झाल्यानंतर पॅकींग करता करता वाट चुकलेल्या एका चतुराने माझे लक्ष वेधले. लगेचच कॅननच्या ५० डी कॅमेर्‍याला टॅमरॉनची ९० मीमीची मायक्रो लेन्स लावून त्याचे छायाचित्र करण्याचा मी प्रयत्न करू लागलो. स्टुडीओ लाइटजवळ एका स्टँडवर तो निवांत बसल्याने मला त्याची मनसोक्त फोटोग्राफी करता आली. शटरस्पीड १ / २५०० सेकंद, अॅपेरचर २.८ आणि २०० आयएसओला हे छायाचित्र घेतले. मावळत्या सूर्याच्या रंगांचा फिल यावा या करीता कॅमेर्‍यातील व्हाईट बॅलन्स हे केल्व्हीन या मोडवर ५४०० या तापमानावर सेट करून छायाचित्र घेण्यात आले आहे.

छायाचित्र ः धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट
छायाचित्रण ठिकाण ः कळवा, ठाणे

www.photoorb.in

(नोंद * सदरचा लेख हा दैनिक सकाळच्या जंगलबुक या सदराकरीता लिहला असून हा लेख ४ जानेवारी, २०१३ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आला होता)

Tuesday, October 15, 2013

चतुरांचे डोळे

हवेतल्या हवेत आपले भक्ष पकडण्यात पटाईत असलेल्या चतुरांना सजीवसृष्टीतील तरबेज शिकारी म्हणून देखील ओळखले जाते. भक्षावर तीक्ष्ण नजर ठेवण्यासाठी चतुरला नैसर्गिक देणगी लाभली आहे ती संयुक्त डोळ्यांची.
चतुरांच्या डोळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. चतुराच्या तोंडाजवळच संयुक्त डोळ्ंयाची रचना केली गेली असून यात तीस हजार भिंगांची मांडणी केलेली असते. या तीस हजार भिंगांच्या माध्यमातून चतुर आपल्या भक्षावर नजर ठेऊन असतो.
चतुराला संयुक्त डोळ्यांच्या जोडीत जरी हजारो भिंग असले तरी त्याला या भिंगांनी रंगांचे ज्ञान होत नाही. रंगांचे ज्ञान व्हावे यासाठी संयुक्त डोळयांच्या जोडीखाली तीन वेगळ्या डोळ्यांची मांडणी केली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, चतुर हे आपल्या संयुक्त डोळ्यांच्या विशीष्ट रचनेमुळे सुमारे ३६० कोनात बघू शकतात.
(वरील छायाचित्रातील चतुराच्या डोळ्यातील एक ठिपका हा त्याचा एक डोळा आहे.)

- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
सदरचे छायाचित्र हे एक्स्ट्रीम मायक्रो या विभागातील आहे. मायक्रो फोटोग्राफीच्या पलिकडची ही फोटोग्राफी असल्याने यात कॅननच्या ५० डी या कॅमेर्‍याला टॅमरॉनच्या ९० मीमी मायक्रो लेन्स शिवाय ६८ मीमीची एक्स्टेन्शन ट्यूब देखील लावण्यात आली होती. या ट्यूबमूळे कॅमेर्‍यात १.७५ पटीचे ऑप्टीकल मॅग्नीफीकेशन मिळवण्यात यश आले. चतुराचे संयुक्त डोळे आणि त्यातील हजारो डोळ्यांची रचना सुस्पष्ट दिसावी यासाठी एका फ्लॅशच्या मदतीने शटर स्पीड १ / २००, अॅपेरचर ९ आणि आयएसओ १०० वर हे छायाचित्र वसई रोडवरील नागलाबंदर येथे घेण्यात यश आले.

छायाचित्र ः धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट
छायाचित्रण ठिकाण ः नागलाबंदर, ठाणे


(नोंद * सदरचा लेख हा दैनिक सकाळच्या जंगलबुक या सदराकरीता लिहला असून हा लेख ३ जानेवारी, २०१३ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आला होता)

Friday, September 13, 2013

रंगीबेरंगी चतुर


  हिरव्यागार वनराईने नटलेल्या ठाणे शहरात चतुरांची संख्या अमाप आहे. जंगलवाटांखेरीज बाग-बगीच्यात, शहरातील तलावांभोवती रंगीबेरंगी चतुर घिरट्या मारताना सहज नजरेस पडतात. ओडोनाटा या गटातील हे चतुर  पृथ्वीवर सुमारे ३०० दक्षलक्ष वर्षांपूर्वी अवतरले असावेत असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जगभरात चतुराच्या सुमारे ५००० जाती नोंदवल्या गेल्या असून त्यापैकी दहा टक्के म्हणजेच सुमारे ५०० जाती भारतात आढळतात.
यरवी हवेत घिरट्या घालणार्‍या चतुरांचा जीवनक्रम तसा निराळाच. चतुराची मादी पाणवनस्पतींच्या पानाखाली वा देठावर तसंचं पाण्याखाली अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं ही पाण्यातील डासांच्या अळ्या, छोटे जलचर यांवर ताव मारून मोठी होतात. सुमारे दोन ते तीन वर्ष जलचर म्हणून वावरल्यानंतर ते प्रौढावस्थेत प्रवेश करतात. बाल्यावस्थेत दोन ते तीन वर्षे जलचर म्हणून वावरणार्‍या चतुरांची पाण्याबाहेरील प्रौढावस्था मात्र काही दिवसांचीच असते.
- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
येऊरच्या जंगलात जमिनीलगत वाळक्या काठीवर बसलेल्या या चतुराचे आय लेव्हलला छायाचित्र घेण्यासाठी जमिनीवर झोपल्याखेरीज काही पर्याय नव्हता. बॅकग्राउंडला  जमिनीचा रखरखीत तपकिरी रंग असल्याने ती अस्पष्ट दिसावी यासाठी कॅमेर्‍यात शॉर्ट डेप्थ ऑफ फिल्डचा वापर केला. कॅमेर्‍यात १ / १२५ सेकंद शटर स्पीड, ६.३ अॅपेरचर तर २०० आयएसओला हे छायाचित्र घेतले गेले आहे. कॅननचा ५० डी आणि टॅमरॉन ९० मिमीच्या मायक्रो लेन्सने हे छायाचित्र घेतले आहे.

छायाचित्र  धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट

छायाचित्रण ठिकाण  येऊर, ठाणे

नोंद
सदरचा लेख दैनिक सकाळ या वृत्तपत्रातील जंगलबुक या लेखमालेतील पहिला लेख असून हा लेख २ जानोवारी, २०१२ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. 

Tuesday, September 10, 2013

सुपरफास्ट ५००

मित्रांनो,

सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, मी प्रसिध्द केलेल्या ब्लॉगला २४ तासही पुर्ण होत नाही तोच त्यावर ५०० हून अधिक लोकांनी भेट दिल्याचं ब्लॉग वरच्या काउंटरवरुन मला नुकतच समजतयं. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार. प्रेमाचा हा वर्षाव असाच सुरु राहील्यास या ब्लॉगच्या माध्यमातून छायाचित्रणाचा प्रचार आणि प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहवण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ यात शंकाच नाही.
+ धनेश पाटील

Monday, September 9, 2013

दहीहंडीचा थरार टिपताना...

“
खरा छायाचित्रकार तो नसतो, जो क्षणांच्या शोधात असतो, तर प्रत्येक क्षणाला; कॅमेर्‍यात बंदिस्त करुन जो अविस्मरणीय बनवतो तोच खरा छायाचित्रकार...

दहीहंडीचा थरार टिपताना प्रत्येक क्षणचं आपल्या सारख्या छायाचित्रकाराला खुणावत असतो. ढाकूमाकूमचा गजर, सरसर थर लावणार्‍या गोविंदा आणि गोपिंकाचा उत्साह, त्यांच्यातली एकता, विवीध रंगी वेशभुषत्ेा रंगलेले तरुण, कधी पावसाची तर कधी टँकरमधून सुखद गारवा देणारी पाण्याची झालेली शिंपड आणि या सगळ्या अल्हाददायी वातावरणात हरपून जाऊन नेमकं कॅमेर्‍यात टिपू तरी काय, याचा विचार करणारा आपल्या सारखा छायाचित्रकार.

   फोटो ऑर्बच्या शूट इट मंथली चँलेजच्या दहीहंडी या विषयावर आयोजित केलेल्या छायाचित्रण स्पर्धेच्या निमीत्ताने अनेक हौशी छायाचित्रकारांचे मला फोन आले आणि नेमके कोणते छायाचित्र या स्पर्धेसाठी पाठवता येतील असा प्रश्नच त्यांनी केला. खरतरं, विषयाचा पसारा फारच मोठा असल्याने याचं नेमकं उत्तर मला देखील देणं तसं कठीणचं होतं. पण, हीच तर खरी गम्मत आहे. विषयाचा पसारा मोठा असला की त्याला कसलंही कुंपण नसतं आणि मग मनाला भिडेल ते छायाचित्र आपण स्पर्धेसाठी पाठवण्याची मुभा आपल्याला मिळते. विषय तसा मोठा असल्याने छायाचित्रकाराला हा विषय तसा सोपा करुन सांगता यावा म्हणून दहीहंडीचा थरार टिपताना... हा लेख लिहून फोटो ऑर्बच्या ऑफिशिल ब्लॉगचा श्रीगणेशा गणेशचतुर्थीच्या दिवशीच करतोय. छायाचित्रकारांना याचा नक्कीच उपयोग होईल...

कॅमेरा हातात घेण्यापूर्वी...
दहीहंडीचा थरार आपल्याला तंत्रशुध्द पध्दतीने कॅमेर्‍यात बंदिस्त करायचा असल्याने लेन्स आणि इतर बाबींची नेमकी निवड करणं फार महत्वाचं ठरतं. वाइड अँगल लेन्स सोबतच टेलिफोटो (३०० मीमी वा अधिक) लेन्स असली तर संपुर्ण माहोल नीट टिपता येईल. सोबत चांगले मेमरी कार्ड, पुर्ण चार्ज बॅटरी आणि ट्रायपॉड वा मोनोपॉड असणं गरजेचेचं आहे.

कॅमेरा सेटींग
कॅमेर्‍याचं तंत्रशुध्द ज्ञान आपल्याला असल्यास कॅमेरा क्रिएटीव्ह मोडवर वापरता येईल अन्याथा प्रोग्राम वा ऑटो मोड सारख्या बेसिक मोडवर कॅमेरा ठेवता येईल. दिवसा प्रकाश चांगला असल्याने ऑटो मोडही आपल्याला चांगली मदत करेल. रात्रीच्यावेळी माज्ञ थोडी खबरदारी घ्यावी लागेल.

वेगळ्या छायाचित्रणाच्या मोजक्या टिप्स

१.
दहीहंडी फोडण्यासाठी उभारलेल्या थरांचे फोटो तर नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, बारा वाजता कृष्णजन्माच्या वेळी करण्यात आलेल्या पुजेचे छायाचित्र फारसे बघायला मिळत नाहीत. लाखमोल रुपयांचा वर्षाव करुन थरांचा रचलेला सोहळा आपलं नेहमीच लक्ष केंद्रीत करतं. मात्र, खरा सोहळा काही मोजकेच आयोजक रात्री बारावाजता कृष्णजन्माच्या वेळी साजरा करतात. हे लक्षात घेऊन सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री न झोपता हा रात्रीचा सोहळा कॅमेरा बध्दकरुनच दहीहंडीच्या छायाचित्रणाची सुरुवात करा.

२.
दहीहंडीचा माहोल कॅमेराबध्द करता यावा म्हणून वाइड अँगल लेन्स वापरुन अधिकाधिक लोकांची गर्दी टिपण्याचा प्रयत्न केल्यास उत्सवाला सोहळ्याचं रुपकसं आलयं, ते दाखवता येईल




३.
गर्दीतही एखादा विशीष्ट चेहरा जो आपलं लक्ष केंद्रीत करुन घेईल त्याला जमिनीलगत वा लो अँगलने जाऊन फोकस करुन शॉर्ट डेप्थ ऑफ फिल्डचा वापर केला तर तो चेहरा नेमका टिपला तर जाईलच, शिवाय फोटोला देखील वेगळी मजा येईल




४.
पाण्याचा मारा केला जात असताना वा पावसाच्या थेंबांची शिंपड झाली असताना हे थेंब कलात्मक दृष्ट्या टिपण्याचा प्रयत्न केला गेला पाहीजे.





५.
छायाचित्र नेहमी लो अँगलने काढतना आकाशाचा निळा रंग पांढरा फट्ट पडतो. याकडे विशेष लक्ष देऊन आकाशाचा नेमका रंग टिपण्यासाठी कॅमेर्‍यातल्या व्हाइट बॅलेन्सला सेट करुन वा लेन्सपुढे फिल्टर्स लावून वेगळे छायाचित्र टिपता येतील

६.
छायाचित्रणात त्याचे नियम पाळणं हे छायाचित्र स्पर्धेच्या दृष्टीने फारचं महत्वाचं असतं. रुल ऑफ थर्ड, रुल ऑफ ऑड हे लक्षात घेऊन कंम्पोझिशन करणं फार महत्वाचं ठरतं.
७.
पाण्याचा मारा नैसर्गिकपणे वा अनैसर्गिकपणे आपल्या कॅमेर्‍यावर होऊ शकतो. हे टाळायचं असल्यास कॅमेरा रेन कव्हर वापरणं शहाणपणाचं ठरतं. ते जर नसेल तर किमान प्लॅस्टीकची पिशवी गुंडाळून कॅमेर्‍याचा बचाव करता येईल.

८.
आपल्या इथे आलेले परदेशी पाहूणे आपल्या उत्सवात किती मग्न झालेत, हे वेगळ्या पध्दतीने दाखवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यातील वेगळेपणचं तुमच्या छायाचित्रणाचं वैशिष्ट ठरेल.




९
उंचच उंच थर झटपट लावण्याच्या घाईत अनेक गोविंदांचे पाय घसरतात आणि उंचावरुन त्यांचा डोलारा कोसळतो. हे नेमकं कॅमेर्‍यात बंदिस्त करायचं असेल तर हाय शटरस्पीडचा वापर करुन ही सगळी अॅक्शन कॅमेराबध्द करा.








१०.
पारंपारिक सणाला पाश्चात्य संस्कृतीची जोड देत तरुणाईने या सणात कसा सहभाग नोंदवलाय ते वैशिष्टपुर्ण कॅमेराबध्द केल्यास एक डॉक्यूमेंटरी शॉट म्हणून तुमच्या छायाचित्राची नक्कीच दखल घेतली जाईल



११.
दहिहंडी फोडल्याच क्षणी हंडीतल्या लोण्याचं चित्र टिपण्यासाठी हाय शटर स्पीड तसचं लो शटर स्पीड या दोहोंचा कलात्मक दृष्टीने वापर करता येईल.

दहीहंडीचा सण जरी नुकताच साजरा केला गेला असला, तरीही या टिप्स तुम्हाला पुढे प्रत्येक वर्षी नक्कीच लक्षात राहतील आणि तुमच्या छायाचित्रणात पॉझीटिव्ह बदल होतील, हीच आशा.
अशाच लेखांसाठी हा ब्लॉग नेहमी पाहत रहा आणि आपल्या मित्रांनाही नक्की सांगा.
(सदरच्या लेखासोबत दिलेले छायाचित्र हे प्रातिनीधिक आहेत. कोणालाही दुखावण्याचा हेतू लेखकाचा नाही. मोजके छायाचित्र मीच टिपलेले सोबत जोडले आहेत. स्पर्धा सध्या सुरु असल्याने कोणत्याही वेगळ्या छायाचित्रकाराचे मुद्दाम छायाचित्रप्रसिध्द केलेले नाहीत.)


 - धनेश पाटील
(आपल्या प्रतिक्रीया जरुर नोंदवा)