Monday, September 9, 2013

दहीहंडीचा थरार टिपताना...

“
खरा छायाचित्रकार तो नसतो, जो क्षणांच्या शोधात असतो, तर प्रत्येक क्षणाला; कॅमेर्‍यात बंदिस्त करुन जो अविस्मरणीय बनवतो तोच खरा छायाचित्रकार...

दहीहंडीचा थरार टिपताना प्रत्येक क्षणचं आपल्या सारख्या छायाचित्रकाराला खुणावत असतो. ढाकूमाकूमचा गजर, सरसर थर लावणार्‍या गोविंदा आणि गोपिंकाचा उत्साह, त्यांच्यातली एकता, विवीध रंगी वेशभुषत्ेा रंगलेले तरुण, कधी पावसाची तर कधी टँकरमधून सुखद गारवा देणारी पाण्याची झालेली शिंपड आणि या सगळ्या अल्हाददायी वातावरणात हरपून जाऊन नेमकं कॅमेर्‍यात टिपू तरी काय, याचा विचार करणारा आपल्या सारखा छायाचित्रकार.

   फोटो ऑर्बच्या शूट इट मंथली चँलेजच्या दहीहंडी या विषयावर आयोजित केलेल्या छायाचित्रण स्पर्धेच्या निमीत्ताने अनेक हौशी छायाचित्रकारांचे मला फोन आले आणि नेमके कोणते छायाचित्र या स्पर्धेसाठी पाठवता येतील असा प्रश्नच त्यांनी केला. खरतरं, विषयाचा पसारा फारच मोठा असल्याने याचं नेमकं उत्तर मला देखील देणं तसं कठीणचं होतं. पण, हीच तर खरी गम्मत आहे. विषयाचा पसारा मोठा असला की त्याला कसलंही कुंपण नसतं आणि मग मनाला भिडेल ते छायाचित्र आपण स्पर्धेसाठी पाठवण्याची मुभा आपल्याला मिळते. विषय तसा मोठा असल्याने छायाचित्रकाराला हा विषय तसा सोपा करुन सांगता यावा म्हणून दहीहंडीचा थरार टिपताना... हा लेख लिहून फोटो ऑर्बच्या ऑफिशिल ब्लॉगचा श्रीगणेशा गणेशचतुर्थीच्या दिवशीच करतोय. छायाचित्रकारांना याचा नक्कीच उपयोग होईल...

कॅमेरा हातात घेण्यापूर्वी...
दहीहंडीचा थरार आपल्याला तंत्रशुध्द पध्दतीने कॅमेर्‍यात बंदिस्त करायचा असल्याने लेन्स आणि इतर बाबींची नेमकी निवड करणं फार महत्वाचं ठरतं. वाइड अँगल लेन्स सोबतच टेलिफोटो (३०० मीमी वा अधिक) लेन्स असली तर संपुर्ण माहोल नीट टिपता येईल. सोबत चांगले मेमरी कार्ड, पुर्ण चार्ज बॅटरी आणि ट्रायपॉड वा मोनोपॉड असणं गरजेचेचं आहे.

कॅमेरा सेटींग
कॅमेर्‍याचं तंत्रशुध्द ज्ञान आपल्याला असल्यास कॅमेरा क्रिएटीव्ह मोडवर वापरता येईल अन्याथा प्रोग्राम वा ऑटो मोड सारख्या बेसिक मोडवर कॅमेरा ठेवता येईल. दिवसा प्रकाश चांगला असल्याने ऑटो मोडही आपल्याला चांगली मदत करेल. रात्रीच्यावेळी माज्ञ थोडी खबरदारी घ्यावी लागेल.

वेगळ्या छायाचित्रणाच्या मोजक्या टिप्स

१.
दहीहंडी फोडण्यासाठी उभारलेल्या थरांचे फोटो तर नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, बारा वाजता कृष्णजन्माच्या वेळी करण्यात आलेल्या पुजेचे छायाचित्र फारसे बघायला मिळत नाहीत. लाखमोल रुपयांचा वर्षाव करुन थरांचा रचलेला सोहळा आपलं नेहमीच लक्ष केंद्रीत करतं. मात्र, खरा सोहळा काही मोजकेच आयोजक रात्री बारावाजता कृष्णजन्माच्या वेळी साजरा करतात. हे लक्षात घेऊन सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री न झोपता हा रात्रीचा सोहळा कॅमेरा बध्दकरुनच दहीहंडीच्या छायाचित्रणाची सुरुवात करा.

२.
दहीहंडीचा माहोल कॅमेराबध्द करता यावा म्हणून वाइड अँगल लेन्स वापरुन अधिकाधिक लोकांची गर्दी टिपण्याचा प्रयत्न केल्यास उत्सवाला सोहळ्याचं रुपकसं आलयं, ते दाखवता येईल




३.
गर्दीतही एखादा विशीष्ट चेहरा जो आपलं लक्ष केंद्रीत करुन घेईल त्याला जमिनीलगत वा लो अँगलने जाऊन फोकस करुन शॉर्ट डेप्थ ऑफ फिल्डचा वापर केला तर तो चेहरा नेमका टिपला तर जाईलच, शिवाय फोटोला देखील वेगळी मजा येईल




४.
पाण्याचा मारा केला जात असताना वा पावसाच्या थेंबांची शिंपड झाली असताना हे थेंब कलात्मक दृष्ट्या टिपण्याचा प्रयत्न केला गेला पाहीजे.





५.
छायाचित्र नेहमी लो अँगलने काढतना आकाशाचा निळा रंग पांढरा फट्ट पडतो. याकडे विशेष लक्ष देऊन आकाशाचा नेमका रंग टिपण्यासाठी कॅमेर्‍यातल्या व्हाइट बॅलेन्सला सेट करुन वा लेन्सपुढे फिल्टर्स लावून वेगळे छायाचित्र टिपता येतील

६.
छायाचित्रणात त्याचे नियम पाळणं हे छायाचित्र स्पर्धेच्या दृष्टीने फारचं महत्वाचं असतं. रुल ऑफ थर्ड, रुल ऑफ ऑड हे लक्षात घेऊन कंम्पोझिशन करणं फार महत्वाचं ठरतं.
७.
पाण्याचा मारा नैसर्गिकपणे वा अनैसर्गिकपणे आपल्या कॅमेर्‍यावर होऊ शकतो. हे टाळायचं असल्यास कॅमेरा रेन कव्हर वापरणं शहाणपणाचं ठरतं. ते जर नसेल तर किमान प्लॅस्टीकची पिशवी गुंडाळून कॅमेर्‍याचा बचाव करता येईल.

८.
आपल्या इथे आलेले परदेशी पाहूणे आपल्या उत्सवात किती मग्न झालेत, हे वेगळ्या पध्दतीने दाखवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यातील वेगळेपणचं तुमच्या छायाचित्रणाचं वैशिष्ट ठरेल.




९
उंचच उंच थर झटपट लावण्याच्या घाईत अनेक गोविंदांचे पाय घसरतात आणि उंचावरुन त्यांचा डोलारा कोसळतो. हे नेमकं कॅमेर्‍यात बंदिस्त करायचं असेल तर हाय शटरस्पीडचा वापर करुन ही सगळी अॅक्शन कॅमेराबध्द करा.








१०.
पारंपारिक सणाला पाश्चात्य संस्कृतीची जोड देत तरुणाईने या सणात कसा सहभाग नोंदवलाय ते वैशिष्टपुर्ण कॅमेराबध्द केल्यास एक डॉक्यूमेंटरी शॉट म्हणून तुमच्या छायाचित्राची नक्कीच दखल घेतली जाईल



११.
दहिहंडी फोडल्याच क्षणी हंडीतल्या लोण्याचं चित्र टिपण्यासाठी हाय शटर स्पीड तसचं लो शटर स्पीड या दोहोंचा कलात्मक दृष्टीने वापर करता येईल.

दहीहंडीचा सण जरी नुकताच साजरा केला गेला असला, तरीही या टिप्स तुम्हाला पुढे प्रत्येक वर्षी नक्कीच लक्षात राहतील आणि तुमच्या छायाचित्रणात पॉझीटिव्ह बदल होतील, हीच आशा.
अशाच लेखांसाठी हा ब्लॉग नेहमी पाहत रहा आणि आपल्या मित्रांनाही नक्की सांगा.
(सदरच्या लेखासोबत दिलेले छायाचित्र हे प्रातिनीधिक आहेत. कोणालाही दुखावण्याचा हेतू लेखकाचा नाही. मोजके छायाचित्र मीच टिपलेले सोबत जोडले आहेत. स्पर्धा सध्या सुरु असल्याने कोणत्याही वेगळ्या छायाचित्रकाराचे मुद्दाम छायाचित्रप्रसिध्द केलेले नाहीत.)


 - धनेश पाटील
(आपल्या प्रतिक्रीया जरुर नोंदवा)

2 comments:

  1. मस्त …… ब्लॉग साठी शुभेच्छा . लिहिते व्हा !!!!
    सोबत एक विनंती : आपण टिपलेल्या फोटोच्या तांत्रिक बाबी ( उदाहरणार्थ शटर स्पीड, iso, lens ) वैगेरे गोष्टींचा उल्लेख केलात तर आमच्या सारख्या सामान्य छायाचित्र रसिकांसाठी खूप बरं होईल.
    धन्यवाद !

    --

    ReplyDelete
  2. सुपर्ब.... फोटोग्राफीतंत्रातील टेक्निकल गोष्टी सोप्या करून आम्हा नवशिकव्यांना शिकवा सर :) :)

    खूप खूप शुभेच्छा :) :)

    ReplyDelete