हिरव्यागार वनराईने नटलेल्या ठाणे शहरात चतुरांची
संख्या अमाप आहे. जंगलवाटांखेरीज बाग-बगीच्यात, शहरातील तलावांभोवती रंगीबेरंगी चतुर
घिरट्या मारताना सहज नजरेस पडतात. ओडोनाटा या गटातील हे चतुर पृथ्वीवर सुमारे ३०० दक्षलक्ष वर्षांपूर्वी अवतरले
असावेत असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जगभरात चतुराच्या सुमारे ५००० जाती नोंदवल्या गेल्या
असून त्यापैकी दहा टक्के म्हणजेच सुमारे ५०० जाती भारतात आढळतात.
यरवी हवेत घिरट्या घालणार्या चतुरांचा जीवनक्रम
तसा निराळाच. चतुराची मादी पाणवनस्पतींच्या पानाखाली वा देठावर तसंचं पाण्याखाली अंडी
घालते. अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं ही पाण्यातील डासांच्या अळ्या, छोटे जलचर यांवर
ताव मारून मोठी होतात. सुमारे दोन ते तीन वर्ष जलचर म्हणून वावरल्यानंतर ते प्रौढावस्थेत
प्रवेश करतात. बाल्यावस्थेत दोन ते तीन वर्षे जलचर म्हणून वावरणार्या चतुरांची पाण्याबाहेरील
प्रौढावस्था मात्र काही दिवसांचीच असते.
- -
छायाचित्राची तांत्रिक माहीती
येऊरच्या जंगलात जमिनीलगत वाळक्या काठीवर बसलेल्या
या चतुराचे आय लेव्हलला छायाचित्र घेण्यासाठी जमिनीवर झोपल्याखेरीज काही पर्याय नव्हता.
बॅकग्राउंडला जमिनीचा रखरखीत तपकिरी रंग असल्याने
ती अस्पष्ट दिसावी यासाठी कॅमेर्यात शॉर्ट डेप्थ ऑफ फिल्डचा वापर केला. कॅमेर्यात
१ / १२५ सेकंद शटर स्पीड, ६.३ अॅपेरचर तर २०० आयएसओला हे छायाचित्र घेतले गेले आहे.
कॅननचा ५० डी आणि टॅमरॉन ९० मिमीच्या मायक्रो लेन्सने हे छायाचित्र घेतले आहे.
छायाचित्र धनेश पाटील, फोटो ऑर्ब इंन्स्टिट्यूट
छायाचित्रण ठिकाण येऊर, ठाणे
नोंद
सदरचा लेख दैनिक सकाळ या वृत्तपत्रातील जंगलबुक
या लेखमालेतील पहिला लेख असून हा लेख २ जानोवारी, २०१२ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता.

No comments:
Post a Comment